इंदौर येथे आजपासून सुरू होत असलेल्या १७ व्या प्रवासी दिवस संमेलनात सहभागी होण्यासाठी अनेक देशांचे राष्ट्रपती आणि प्रतिनिधी भारतात येत आहेत. गुयाना आणि सुरीनामच्या राष्ट्राध्यक्षांनीही भारताला भेट दिली आहे. इंदौरमध्ये रविवारपासून सुरू होणाऱ्या प्रवासी दिवस संमेलनात दोन्ही नेते सहभागी होणार आहेत. गुयानाचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद इरफान अली सात दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. ते भारतातील सर्वात मोठ्या प्रवासी दिवस संमेलनाचे प्रमुख पाहुणे आहेत आणि प्रवासी भारतीय सन्मान पुरस्काराचे प्राप्तकर्ता देखील आहेत. तर सुरीनामचे राष्ट्रपती चंद्रिका प्रसाद संतोखी हे विशेष अतिथी आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दोन्ही पाहुण्यांचे स्वागत केले.
सुरीनामचे राष्ट्रपती चंद्रिका प्रसाद संतोखी ही इंदौरला पोहोचले आहेत. मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा, जलसंपदा मंत्री तुलसी सिलावट आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. प्रवासी दिवस परिषदेला उपस्थित राहिल्यानंतर, दोन्ही नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत, ज्यात ते स्थलांतर, गतिशीलता, अन्न प्रक्रिया आणि ऊर्जा यावर चर्चा करतील. दोन्ही नेते परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचीही भेट घेतील आणि १४ जानेवारीला भारतातून पुढे त्यांच्या त्यांच्या देशात जातील . इंदौरमध्ये तीन दिवसीय प्रवासी संमेलन अशा वेळी होत आहे जेव्हा भारत ‘अमृत काल’च्या कालखंडात प्रवेश करत आहे आणि देशासाठी पुढील 25 वर्षांची व्हिजन तयार करत आहे.
या समारंभाच्या समारोपाला ऑस्ट्रेलियाच्या संसद सदस्य जानेटा मैस्करेनहास विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सोमवारी, ९ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी या संमेलनाचे औपचारिक उद्घाटन करतील. पण रविवारपासूनच संमेलन सुरू होणार आहे . या सर्व कार्यक्रमाची रूपरेखा दोन वर्षांपूर्वी ठरली होती.