उत्तराखंडमधील जोशीमठ येथे राहणाऱ्या 600 कुटुंबांना तातडीने स्थलांतरित करण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. ज्या कुटुंबांची घरे राहण्यास योग्य नाहीत किंवा खराब झाली आहेत, त्यांना भाड्याच्या घरात राहण्यासाठी सरकारकडून दरमहा 4 हजार रुपये देण्यात येणार आहेत. ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता मदत निधीतून सहा महिन्यांसाठी दिली जाईल. मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे .
शुक्रवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत धोक्याचे क्षेत्र तातडीने रिकामे करण्याचे आणि बाधित कुटुंबांसाठी सुरक्षित ठिकाणी मोठे पुनर्वसन केंद्र बांधण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री धामी शनिवारी जोशीमठला भेट देणार आहेत. जोशीमठच्या रविग्राम, गांधीनगर आणि सुनील वॉर्डात याचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. हे शहर 4,677 चौरस किमीमध्ये पसरले आहे. गेल्या 13 वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
जोशीमठ येथील जमीन भूस्खलन मोठ्या प्रमाणात होत आहे . तेथील 561 घरांना तडे गेले आहेत. यामुळे लोक घाबरले आहेत. 50 हजार लोकसंख्येच्या या शहरात नागरिकांना दिवस काढणे खूप अवघड झाले आहे . कडाक्याच्या थंडीत लोकांना घराबाहेर राहावे लागत आहे. घरही कोसळण्याची भीती त्यांना आहे. सिंगधार वॉर्डात शुक्रवारी संध्याकाळी एक मंदिर कोसळले. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ५० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.त्याचबरोबर केंद्र सरकारने एनटीपीसी तपोवन-विष्णुगड जलविद्युत प्रकल्प आणि हेलांग बायपासचे काम पुढील आदेशापर्यंत थांबवले आहेत .
प्रशासन आणि राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांसह तज्ज्ञांच्या पथकाने जोशीमठमधील बाधित भागांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले आहे. जोशीमठ अलकनंदा नदीकडे सरकत आहे. तात्काळ निर्णायक पावले उचलली नाहीत, तर मोठा अनर्थ घडू शकतो, असा इशारा भूवैज्ञानिकांनी दिला आहे. जोशीमठाचे अस्तित्व पुसले जाऊ शकते अशी शंका देखील भूवैज्ञानिक वार्तावत आहेत .