दिल्लीत थंडीचा पारा 2 अंशांच्या खाली घसरला

देशाची राजधानी दिल्लीत थंडीची लाट कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. जानेवारीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये, दिल्ली सहसा सकाळी दाट धुक्याच्या चादरीमध्ये लपेटलेली दिसते, परंतु दिवस जसजसा वाढत जातो तसतसे ते गरम होऊ लागते. मात्र, यावेळी दिल्लीतील हवामान थोडे बदलले आहे. देशाच्या राजधानीत थंडीचा मोठा तडाखा पहायला मिळत आहे की, दिवसभर हवेत थंडी आणि गारवा जाणवत आहे. त्याचवेळी थंडीसोबत धुक्याचे दुहेरी आक्रमण पाहायला मिळत आहे.

दिल्लीतील अनेक भागात पारा 2 अंशांच्या खाली गेला आहे. आज 8 जानेवारी हा दिल्लीतील या मोसमातील सर्वात थंड दिवस आहे. सफदरजंग येथे किमान तापमान 1.9 अंश नोंदवण्यात आले आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील पालम भागात आज (रविवार) 8 जानेवारीला किमान तापमान 2.0 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तर सफदरजंग येथे 1.9, लोधी रोड 2.8, रिज 2.2 आणि आयानगर येथे 2.6 अंश सेल्सिअस किमान पारा नोंदवला गेला.

भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, आज म्हणजेच 8 जानेवारी रोजी दिल्लीत थंडीची लाट कायम राहणार असून, या दरम्यान किमान तापमान 2 अंश आणि कमाल तापमान 17 अंश सेल्सिअस असू शकते. थंडीच्या लाटेबरोबरच धुकेही त्रासदायक ठरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे .

दिल्लीत दाट धुके आणि प्रदूषणाचा फटका कायम आहेच . दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) अत्यंत खराब श्रेणीत आहे. आज सकाळी दिल्लीचा सरासरी AQI 359 नोंदवला गेला आहे. थंडी आणि धुक्याच्या दुहेरी तडाख्याचा सामना करणाऱ्या दिल्लीत उड्डाणांवरही परिणाम होत आहे. त्याचबरोबर रेल्वे गाड्याही त्यांच्या नियोजित वेळेपासून उशिराने धावत आहेत.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार दिल्लीत आज (रविवार) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राष्ट्रीय राजधानीतील सर्व भाग मध्यम ते दाट धुक्याच्या चादरीमध्ये लपेटले गेले आहेत. धुक्यामुळे सुमारे 20 विमान उड्डाणे नियोजित वेळेपेक्षा उशीरा उड्डाण झाली आहेत. गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीतील किमान तापमान हिल स्टेशनपेक्षा कमी नोंदवले जात आहे. म्हणजे दिल्लीत हिमप्रदेशापेक्षाही जास्त थंडी पडू लागली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published.