जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील ढांगरी येथे आयईडी स्फोट झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटात 1 मुलीचा मृत्यू झाला आहे. तर या स्फोटात ५ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या ठिकाणी IED स्फोट झाला, त्याच ठिकाणी काल रात्री दहशतवाद्यांनी 4 जणांची हत्या केली. ही घटना घडवून आणल्या नंतर दहशतवाद्यांनी स्फोटाच्या ठिकाणी IED पेरल्याचा संशय आहे.
ADGP मुकेश सिंह यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरच्या राजौरी येथील ढांगरी गावात काल झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर आज पीडितेच्या घराजवळ स्फोट झाला. या स्फोटात 5 जण जखमी झाले असून त्यापैकी 1 मुलीचा मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती गंभीर आहे. ADGP मुकेश सिंह म्हणाले की, परिसरात आणखी एक संशयित आयईडी सापडला आहे, जो निकामी केला जात आहे. स्फोटाच्या काही वेळापूर्वीच ढांगरी चौकात निदर्शने झाली. यानंतर काही वेळातच त्याचा स्फोट झाला. सध्या सुरक्षा दल घटनास्थळी हजर आहेत.
जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी राजौरी येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. उपराज्यपाल कार्यालयाने सांगितले की, या भयंकर हल्ल्यात ठार झालेल्या प्रत्येक नागरिकाच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये आणि सरकारी नोकरी दिली जाईल. गंभीर जखमींना एक लाख रुपये देण्यात येणार आहेत.