संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनला दिला इशारा

तवांग सीमा वादानंतर प्रथमच अरुणाचल प्रदेशात पोहोचलेल्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनला खडे बोल सुनावले की, भारत प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यास सक्षम आहे. देशाच्या सीमेवरील विरोधकांची आव्हाने मोडून काढण्याची भारताकडे ताकत आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी सांगितले. चीनचे नाव न घेता ते म्हणाले की, भारत कधीही युद्धाला प्रोत्साहन देत नाही आणि नेहमीच आपल्या शेजाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवू इच्छितो.

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) ने बांधलेल्या पुलाचे उद्घाटन केल्यानंतर राजनाथ सिंह म्हणाले, ‘भारतीय सैन्य सीमेवर कोणत्याही आव्हानाचा सामना करण्याची क्षमता आहे आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे.’

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, ‘भारत हा असा देश आहे जो कधीही युद्धाला प्रोत्साहन देत नाही आणि आपल्या शेजाऱ्यांशी नेहमीच सौहार्दपूर्ण संबंध ठेवू इच्छितो… हे आपल्याला प्रभू राम आणि भगवान बुद्धांच्या शिकवणीतून मिळाले आहे. मात्र, चिथावणी दिल्यास कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता भारत देशामध्ये आहे.

9 डिसेंबर रोजी तवांग भागात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर राजनाथ सिंह यांचा अरुणाचल प्रदेशचा हा पहिलाच दौरा आहे. येथे संरक्षणमंत्र्यांनी बीआरओने (BRO) बांधलेल्या 28 पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन केले. जड तोफा आणि भारतीय सशस्त्र दलाच्या सैनिकांची सीमेपलीकडे हालचाल सुलभ करण्यासाठी हे प्रकल्प बांधले जात आहेत.बीआरओच्या कार्याचे कौतुक करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, आमचे सशस्त्र दल कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सदैव तयार आहे आणि बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन त्यांच्यासोबत काम करत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published.