जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी आपल्या सतर्कतेने दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला आहे. बुधवारी पहाटे जम्मू – काश्मीर मधील सिध्रा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने सिध्रा भागात ४ दहशतवाद्यांचा खात्मा केला. घटनास्थळी या कारवाई वेळी पोलीस, सीआरएफ आणि लष्कराचे पथक उपस्थित होते. चकमकीनंतर सर्व परिसरात आता शोधमोहीम राबविण्यात येत आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून सात AK -47, तीन पिस्तुल व अन्य हत्यार सापडली आहेत .
सुरक्षा दलांना मिळालेल्या माहितीनुसार , परिसरात नाकाबंदी करून वाहनांची चेकिंग केली जात होती . बुधवारी सकाळी पोलिसांनी तपासादरम्यान एका भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकला अडवले असता . सुरक्षा दलाला पाहताच ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. सुरक्षा दलांना संशय आला आणि ते सावधपणे ट्रकजवळ झडती घेण्यासाठी गेले, असता ट्रकमध्ये बसलेल्या दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यामध्ये सुरक्षा दलांनी ट्रकमध्ये लपलेल्या तीन दहशतवाद्यांना ठार केले. काही दिवसांपूर्वी याभागातील पोलीस चौकीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.